सोयाबीनच्या कामावर मजूर घेऊन जाणा-या वाहनाला अपघात

 एक महिला ठार तर 13 जखमी: चौघांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर : सावली तालुक्यातील उपरी येथील मजूर सोयाबीन काढणीच्या कामाकरिता बुलढाणा जिल्ह्यात पिकअप वाहनाने जात असतानाच सावली येथील महाकाली नगरी जवळ वाहनाचा अपघात होऊन 1 ठार तर 13 जखमी झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री 10 वाजताचे सुमारास घडली. लताबाई टिकाराम थोरात (55) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

तालुक्यातील शेतीच्या हंगामाची कामे संपत आलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील मजूरवर्ग कुटुंबाचा उदर निर्वाह चालविण्याकरिता परप्रांतात व परजिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामाकरिता जात असतात. उपरी येथील 14 मजूर त्याच गावातील पिकअप वाहन क्रमांक M H-34 BG – 9054 या वाहनाने बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामाकरिता निघाले होते. वाहन भरधाव वेगाने जात असताना सावली येथील महाकाली नगरी जवळ समोरून दुसरे वाहन आले असता वाहन बाजूला घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटले.

त्यात लताबाई टिकाराम थोरात यांचा मृत्यू झाला तर संगीता जगदीश रोहणकर (35) सुरज टिकाराम थोरात (23) पुरुषोत्तम बोदलकर (50) पुष्‍पाबाई पुरुषोत्तम बोदलकर (45) रोशन दिवाकर कोठारे (30) नीलिमा रोशन कोठारे (28) जनार्धन तुकाराम कुडकर (45) उषा सातपुते (45) स्वामीना जगदीश रोहणकर (19) विकेश चोखाजी बारसागडे (28) संजय बाजीराव भोयर (43) रामचंद्र सातपुते (52) ललिता बाळू कोटगले (40) असे जखमी असून सर्वांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु चार मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारा करीता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पुढील तपास पोउपनि शिरसाट यांच्या मार्गदर्शनात पीएसआय चिचघरे, दीपक जाधव करीत आहे.