१५ दिवसांचे बाळाची विक्री करणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद

यवतमाळ : दत्तक देण्याच्या आमिषाने बाळाची विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.‘बाळ दत्तक घेण्यासाठी उपलब्ध आहे’, असा मेसेज यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून ३६ तासांत स्टिंग ऑपरेशन करून १५ दिवसांच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत आज संध्याकाळी बाळालाही ताब्यात घेतले आहे.

‘बेटी फाऊंडेशन’ या संस्थेने १५ दिवसांचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला. हा मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी या मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक बनून या संस्थेला फोन केला. तसेच महिला व बालकल्याण आयुक्तांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशनची योजना आखली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डमी पालक म्हणून विक्री करणाऱ्या संस्थेला बाळ विकत घेण्याची योजना आखली.

त्यानुसार आज ३० सप्टेंबरला अवैध बाळ दत्तक व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणेद्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. बाळाची विक्री करणारी टोळी  अटक केली असून त्यात संबंधित बाळाचे आई- वडील, आणि यात सहभागी होते. बेटी फाउंडेशनच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( बाळाची विक्री करणारी टोळी ) ताब्यात घेतलेले बाळ बालगृहात ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा, पोलिस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे. कारवाई दरम्यान यवतमाळ बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील घोडेस्वार, जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, अकोला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनीता शिरफुलें, रवींद्र गजभिये महिला व बाल विकास कर्मचारी, ठाणेदार व सर्व पोलिस टीम उपस्थित उपस्थित होती.