खड्डा चुकविण्याच्या नादात कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू; मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश

नागपूर : खड्डा चुकविण्याच्या नादात कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. नागपूर-अमरावती रोडवरील बाजारगाव जवळ कारला हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली आणि सर्व्हिस रोडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच जणांना उडवित पलटी झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याच्या घटनेने शहर हादरून गेले आहे.

मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश

मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश आहे. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी येथे घडली आहे.

बंडू नमोराव सालवनकर (५५, सातनवरी), शौर्य सुबोध डोंगरे (९), शिराली सुबोध डोंगरे (६) व चिन्नू विनोद सोनबरसे (१३, सातनवरी) अशी मृतांची नावे आहेत.