वेकोलितील ट्रक जळीत प्रकरणाला व्यावसायिक स्पर्धेची किनार

◆ पैनगंगा कोळसा खाणीतील प्रकाराने खळबळ
◆ कायद्याचा धाक नसल्याने गुन्हेगारीत वाढ

चंद्रपूर : वेकोलीचे पैनगंगा कोळसा खाणीत कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. तसेच चालकाला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे वेकोलि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेला व्यावसायिक स्पर्धेची किनार असल्याची चर्चा आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याने मागील काही दिवसांत गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

वेकोलीच्या मिनिरत्न दर्जा प्राप्त पैनगंगा कोळसा खाणीत रविवार रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान रेल्वे साईडिंग घुग्घुस वरून पैनगंगा खाणीकडे जात असलेल्या चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH34 BG 0862 क्रमांकाचे अठरा चाकी वाहनाला चार ते पांच अज्ञात आरोपीने कैलासनगर गेट परिसरात अडविले. त्यानंतर चरणदास शेनुरवार चालकाला खाली उतरवून मारहाण केली आणि पेट्रोलद्वारे ट्रॅक पेटवून दिली.

या घटनेमुळे कोळसा खाण परिसरात खळबळ उडाली आहे. एखाद्या खाणीत प्रवेश करून ट्रक पेटविण्याची ही प्रथमच घटना असून आरोपींना कायद्याचा कुठलाच वचक शिल्लक राहिलेला नाही अशी प्रचिती येत आहे.
मात्र, सदर प्रकरणात व्यावसायिक प्रतिस्पर्धाअंतर्गत एका ट्रान्सपोर्टर विरोधात षड्यंत्र रचल्या जात असल्याचा भास होत आहे. कारण चार-पाच दिवसापूर्वी उसगाव येथे अन्य ट्रान्सपोर्टरला सोडून याच ट्रान्सपोर्ट विरोधात रास्ता रोको करण्यात आला होता, हे विशेष.