अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू ; कोठारी-आक्सापूर राज्य महामार्गावर अपघात

चंद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ४ च्या उघडकीस आली आहे. ही घटना आक्सापूर पासून २ किमी अंतरावरील जंगल परिसरात एफडीसीएम कक्ष क्र. 123 मध्ये घडली आहे.

आक्सापूर हा परिसर जंगलपरिसराला लागून आहे. तसेच, कोठारी-आक्सापूर हा राज्य महामार्ग असून या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे, या मार्गावर अनेकदा वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटना घडत असतात. त्यात बुधवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत आणखी एका बिबट्याचा बळी गेला आहे.

चंद्रपूर – अहेरी मार्गावरील झरण वनपरिक्षेत्रात एफडीसीएम कक्ष क. 123 मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्रातील वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. मृत बिबट हा चार वर्षाचा होता, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी लावला असून याप्रकरणी पुढील तपास सूरू आहे. मात्र, अशाप्रकारे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे सत्र नित्यनियमाचे झाले असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.