वीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने आश्रय घेतलेल्या झाडावर वीज कोसळल्याने दोन शेतकऱ्यांसह 41 जनावरे ठार झालीत तर तीन महिला जखमी झाल्यात.चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट,यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी आणि राळेगाव तालुक्यातील शेतशिवारात बुधवारी दुपारी ह्या घटना घडल्यात.

चंद्रपूर : बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वारलू जंगलूजी रामटेके ( वय ४५ , रा . लक्कडकोट ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वारलू रामटेके आपल्या शेतात कामे करीत होते. दुपारी अचानकपणे विजाच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात असतानाच वारलू रामटेके यांच्यावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वणी : विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वरझडी (गोपालपूर) येथे घडली. शंकर गणपत लोणबळे( वय ४०) असे मृतकाचे नाव आहे तर पिंगला पुंडलिक लोणबळे (वय ४५) सुचिता मारोती काळे (वय ४५) असे जखमी महिलाचे नाव आहे. शंकर लोणबळे यांच्या शेतात मशागतीचे काम सुरू होते. दुपारी ३ वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे पावसापासून संरक्षण करण्यासाठी हे तिघेही झाडाखाली थांबले तेवढ्यात त्यांच्या अंगावर विज पडली. त्यात शेतमालकाचा मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

झरी : खातेरा गावातील तीन शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. शेळ्या चारत असताना दुपारी ४ वाजेच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले. पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. तिघांनी शेळ्याचा कळप आश्रयासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली एकत्र गोळा केला. नेमक्या त्याच झाडावर विज पडल्याने ५० पैकी २६ शेळ्या जागीच ठार झाल्यात. सुदैवाने हे तिघेही शेळीपालक दुर उभे असल्याने बचावले.

राळेगांव : तालुक्यातील आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड जंगलात मंगळवारी (ता.६) दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान वीज पडून १५ मेंढी ठार तर एक महिला जखमी झाली. वरुड गावालगत जंगल असून या जंगलात धनगर समाज आपल्या मेंढ्या चराईसाठी वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारी वीज पडल्याने १५ मेंढ्या ठार झाल्यात तर अनिता कुबडे ही शेतात काम करीत असताना जखमी झाली आहे.