संजय येरणे यांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मान

पं.स.नागभीडचे प्रयोगशिल शिक्षक : इंग्लिश रिडींग पॅटर्नच्या संशोधनाची दखल

चंद्रपूर : शिक्षकांच्या सर्वांगिण गुणात्मक कार्याची दखल घेवून दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कृत करण्यात येते. यंदा जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक संजय येरणे यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते येरणे दांपत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरणूले, उपाध्यक्षा सुरेखा कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जितेंद्र लोखंडे व मान्यवर उपस्थित होते.

संजय येरणे हे तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षक असून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी त्यांनी इंग्लिश रीडिंग पॅटर्नचे संशोधन करून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रकाशित केले. यातून इंग्रजी वाचन कौशल्य वाढवण्यास मदत झाली असून या संशोधनाची विशेष दखल घेण्यात आली. २० वर्ष सेवा कालावधीत त्यांनी मोहाडी, नवेगाव हुंडे या शाळेत योगदान देत गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न केले. ते राज्यात प्रसिद्ध साहित्यिक म्हणून नावलौकिक असून कथा, कविता, कादंबरी, संपादन, समीक्षा आदी लेखन प्रकारातील त्यांचे २५ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. संत साहित्य अभ्यास, संशोधन कार्य, जगातील संताजी या विषयावरील पहिली कादंबरी साकारण्याचा सन्मान महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या साहित्याची दखल झाली आहे.

साहित्य लेखन व वाचनासोबतच शिक्षण क्षेत्रातही नवे उपक्रम राबवण्यात ते अग्रेसर आहेत. शैक्षणिक उपक्रम, संशोधन व वैचारिक लेखन कार्य, डिजिटल शैक्षणिक अध्यापन पद्धती, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य, शिष्यवृत्ती, नवोदय मार्गदर्शन, लोकसहभाग, शाळा सजावट व्यवस्थापन निर्मिती, आदी उपक्रमात ते सक्रीय आहेत. त्यांच्या निवडीबद्दल नागभीडचे पं.स.सभापती प्रफुल खापर्डे, गट विकास अधिकारी संजय पुरी, गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट, शिक्षण विस्तार अधिकारी बांगरे, केंद्रप्रमुख प्रदीप मोटघरे, सागर शंभरकर, मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, नरेंद्र वासनिक तसेच सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.