जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा वाघाने घेतला बळी

शेतकरी शेतमजूर आणि गुराख्याच्या वाघाच्या हल्ल्यातील घटनांत वाढ

चंद्रपूर : जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज रविवारी (१० आॅक्टोबर) ला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. राजेंद्र नामदेव ठाकरे (४२) रा. चिचोली असे मृताचे नाव आहे.

बफर वनपरीक्षेञ मूल अंतर्गत काटवन नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५६ मध्ये चिचोली येथील गुराखी राजेंद्र नामदेव ठाकरे (४२) स्वतःची गुरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. झुडपात बसलेल्या वाघाने दुपारी ३.३० वाजताचे सुमारास हल्ला करून ठार केले. वाघाने हल्ला करताच गुराख्याने आरडाओरड केली. सदर घटना स्थळापासुन काही अंतरावर गुरे चारणा-या अन्य एका गुराख्यास ही घटना लक्षात आली. त्याने घटनेची माहिती मृतक राजेंद्र ठाकरे यांच्या कुटूंबियाला दिली. तसेच वनविभाग आणि पोलिसांनाही कळविण्यात आले. वनविभागाचे वनपरीक्षेञ अधिकारी जी. आर. नायगमकर, क्षेत्ररक्षक जोशी आणि वनरक्षक बंडु परचाके यांनी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने राजेंद्र ठाकरे यांचा शोध घेतला असता घटनास्थळापासुन काही अंतरावर राजेंद्र ठाकरे यांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मौका चौकशी करून मृतक राजेद्र ठाकरे यांचे पार्थिव शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या स्वाधीन केले. मृतकाचे पश्चात पत्नी, दोन मूली आणि एक मुलगा आहे. वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणुन २५ हजार रूपये मृतकाच्या पत्नीला देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात कर्ता पुरूष गेल्याने मृतक राजेंद्रचे कुटुंब उघड्यावर पडल्याने वनविभागाने मृतकाच्या पत्नीला मोठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाघाच्या हल्ल्यातील घटनांत वाढ

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ठार होण्याच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे. दिवसागणिक मुल, सिंदेवाही नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये शेतकरी शेतमजूर गुराखी यांचे वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील सहा महिन्यांच्या कार्यकाळात अनेकांचे बळी गेले आहेत. जनावरे चरायला नेणे, मोहफुले गोळा करणे, जंगलालगत शेतात काम करीत असतांना अनेकांना आपले जीव गमवावे लागले.

वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्व स्तरावर होत असताना या विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. अनेक कुटूंबातील कर्ता गेल्याने कुटूंबाचे जिवन जगणे दुरापास्त झाले आहे. तोकड्या मदतीवरक्षतिग्रस्त कुटूंबियांची बोळवण केली जात आहे.