मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील २३ गावांतील ११५ पीआरटी सदस्यांना वनविभागाच्या वतीने प्रशिक्षण

चंद्रपूर : वन्यजीव सप्ताह निमित्त ब्रम्हपुरी येथील पं.दिनदयाल उपाध्याय इको पार्क येथे ब्रम्हपुरी वनविभागाच्या उत्तर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या २३ गावांतील प्राथमिक कृती दलाच्या ११५ सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सहाय्यक वनसंरक्षक वाकडे, इको प्रो चे बंडु धोतरे, ब्रम्हपुरी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी पुनम ब्राम्हणे, वन्यजीव तज्ञ राकेश आहुजा ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रम्हपुरी तालुक्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर आळा घालण्यासाठी वनविभाग सदैव तत्पर असतो. मात्र तरीसुद्धा अनपेक्षितपणे अनेकदा मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या घटना टाळण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाच्या वतीने प्राथमिक कृती दलाच्या सदस्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्राथमिक कृती दलाचे सदस्य हे वनविभाग व गावकरी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्यरत आहेत. वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून गुराख्यांनी व नागरिकांनी जंगलात प्रवेश करतांना सावध असावे व जंगलाच्या एकदम आतमध्ये प्रवेश करू नये. भल्या पहाटे जंगलात जाऊ नये. याबाबत जनजागृती करण्यासाठी पी.आर.टी. पथकाच्या सदस्यांना सांगण्यात आले. सोबतच मानव वन्यजीव संघर्ष झाल्यास अथवा वन्यजीवाने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे. वन्यप्राण्यांनी शेतपिकांची नुकसान केल्यास सदरची माहिती वनविभागाला कळवावी. मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी व येणाऱ्या प्रसंगास परिस्थितीनूरूप कशा प्रकारे सामोरे जायचे यावर प्राथमिक कृती दलाच्या सदस्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ब्रम्हपुरी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयानजीक असलेले पंडित दिनदयाल उपाध्याय इको पार्क मध्ये कोरोना काळात नागरिकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र आता जनजीवन पुर्वपदावर आल्याने सदर इको पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.