अतिउत्साही कार्यकर्त्यानी असा पत्र व्यवहार करणे योग्य नव्हे : आमदार सुभाष धोटे

 त्या युवकाला शोधण्याचे आमदार महोदयांचे कार्यकर्त्यांना आदेश

चंद्रपूर : मुलगी किंवा आपल्याला आवडणारी एखादी मुलगी भाव देत नाही म्हणून आतापर्यंत अनेक मुलं एखाद्या अनुभवी माणसाचा किंवा लव्ह गुरुचा सल्ला घेताना आपण पाहिली असतील. परंतू चंद्रपुरातील राजूरा येथील एका तरुणाने तर हद्दच पार केली आहे. गर्लफ्रेंड पटत नाही म्हणून या तरुणाने थेट राजुऱ्याचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनाच पत्र लिहीलं आहे.

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, मला एकही पटेना. माझा जीव जळून जातो अशा आशयाचा आर्त मजकूर या पत्रात लिहीला आहे. परंतू हे पत्र आमदार धोटे यांना अद्याप मिळालेलं नसल्याचं कळतंय. तसंच हे पत्र लिहीणारा तरुण नेमका कोण आहे आणि कुठे राहतो, काय करतो याबद्दलही नेमकी माहिती कळू शकलेली नाहीये.

जाणून घ्या काय म्हणलं आहे या पत्रात?

प्रती, आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा

विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत           अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड

महोदय,

सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा

आपला प्रेमी
भूषण जांबुवंत राठोड

दरम्यान हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेलं असलं तरीही आपल्यापर्यंत हे पोहचलेलं नसल्याचं काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी सांगितलं. आपल्या कार्यकर्त्यांना या युवकाला शोधण्याचे आदेश धोटे यांनी दिले आहेत. हा तरुण सापडला तर त्याची विचारपूस करुन योग्य ते मार्गदर्शन करुन समजूत काढली जाईल परंतू अशा पद्धतीने पत्र लिहीणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हणलं आहे.