गोपानीचे कामगार वाऱ्यावर, एम्टावर उफाळले दादांचे प्रेम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग, उद्या मुंडण करणार

चंद्रपूर : ताडाळी येथील गोपानी आर्यन कंपनीतील पाचशे कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घरचा रस्ता दाखविला. गेल्या सतरा वर्षांपासून कार्यरत कामगारांचे हातचे काम गेल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अन्यायाविरोधात कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या कंपनीत दोनशे कामगारांचे कंत्राटदार भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आहेत. त्यांच्याकाही कामगारांवर आता उपासमारीचे संकट ओढावले आहे. या अन्यायाविरोधात ठेकेदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे काहीच बोलायला तयार नाही. त्यांनी उपोषण मंडपाला साधी भेट देण्याचे औचित्य दाखविले नाही.

मात्र, दुसरीकडे त्यांचे कर्नाटका एम्टावर प्रेम उफाळून आले आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ते आता लढा देत आहेत. मात्र, त्यांना गोपानीतील आपल्याच कामगारांवरील अन्यायाचा विसर पडला आहे. ताडाळी येथील एमआयडीसीत गोपाणी आर्यन अँड पॉवर कंपनी आहे. (इं)प्रा.लि.या कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता पाचशे कामगारांना कामावरून बंद केले.

या कंपनीत कार्यरत कामगारांपैकी दोनशे कामगार हे भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व त्यांच्या बहीण संगीता थेरे यांचे आहे. तर उर्वरित माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा भाचा मोनू चौधरी व अन्य ठेकेदारांचे आहे.या कंपनीत शेकडो कामगार कार्यरत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वीच कंपनीने कामगारांचे जुलै महिन्याचा अर्धा पगार कपात केला. नंतर 03 सप्टेंबर 2021 ला एकशेवीस कामगारांना कामावरून कमी केले. मात्र एवढया मोठ्या प्रमाणात कामगारांना कमी केल्यानंतर ठेकेदार भोंगळे यांनी त्यांच्या समर्थनार्थ एक शब्दही काढला नाही.

गोपाणीच्या पीडित कामगारांनी 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे दिले. मात्र, त्याचा फायदा काहीच झाला नाही. त्यामुळे या कामगारांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मुंडन आंदोलन करणार आहे. दरम्यान, बरांज येथील कर्नाटका एम्टातील प्रकल्पग्रस्तांवर दादांचे अचानक प्रेम उफाळून आले आहे. त्यांनी या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.