महिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू

चंद्रपूर : अहो, ऐकून नवल वाटेल पण खरे आहे. सहा वर्षांनंतर दारूबंदी उठताच चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यशौकिनांनी महिनाभरात तब्बल ६५ कोटींची दारू रिचवली आहे. दारू दुकाने केव्हा सुरू होतील, याची मद्यपी चातकासारखी वाट बघत होते. अखेर, ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच तळीराम दारू दुकानांवर तुटून पडले होते. अवघ्या महिनाभरात तब्बल १२ लाख २४ हजार ३९० बल्क लीटर इतकी दारू तळीरामांनी ढोसल्याचे पुढे आले आहे.

सर्वाधिक ८ लाख २ हजार १०५ बल्क लीटर देशी दारू तळीरामांनी रिती केली असून पाठोपाठ २ लाख १२ हजार ५५२ बल्क लीटर विदेशी, १ लाख ८८ हजार ७२८ बल्क लीटर स्ट्राँग बीयर व १९ हजार ४१ बल्क लीटर माइल्ड बीयर, तर १ हजार ९६४ बल्क लीटर वाइनचा आनंद लुटला आहे. ५ जुलैला दारूची प्रत्यक्षात परवानाप्राप्त दुकानातून विक्री सुरू झाल्यापासून आजघडीला ३६० दारूची दुकाने सुरू झालेली आहेत. यामध्ये २५० परमिट रूम (बीयर बार), ३२ बीयर शाॅपी, २ क्लब, ४ वाइन शाॅपी व देशी दारूची ७२ दुकाने अधिकृतरीत्या सुरू झाली आहेत. यानुसार सुमारे २९ कोटी ९४ लाख रुपयांची देशी दारू विकली गेली आहे. पाठोपाठ सुमारे २८ काेटी ३४ लाख रुपयांची विदेशी दारू विकली गेली. सुमारे ६ कोटी ५३ लाखांची बीयर विकली गेली, तर १३ लाखांची वाइनही विकली गेली.

चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे. येथे कामगार, मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर श्रमपरिहार म्हणून ही मंडळी देशी दारूला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दैनंदिन मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे देशी दारूची सर्वाधिक विक्री झाल्याचे बोलले जात आहे. दारू मूळ किमतीत मिळत असल्यामुळे पिण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे.