वन्यप्राण्याच्या हल्लात ६१ वर्षीय वृद्धाचा डोळा निकामी

• प्रमाणपत्रावर अपंगत्वाचा उल्लेख करण्यास टाळाटाळ
• अधिक्षक डाॅ. सोनारकर यांना निलंबित करा

चंद्रपूर : अस्वलाच्या हल्ल्यात पायली-भटाळी येथील 61 वर्षीय वृद्धाचा डोळा निकामी झाला. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांनी पिडिताला प्रमाणपत्र देताना अपंगत्व आल्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे जखमीला वनविभागातर्फे मिळणार्‍या मोबदल्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे डॉ. सोनारकर यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी भूमीपुत्र ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यासह संबंधित वृध्दाच्या नातेवाईकांनी यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत केली.

26 जुलै रोजी सुरेश खिरटकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमीला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले गेले. पण सिटी स्कॅन यंत्र नसल्याने कारण सांगून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. उपचाराअंती ते चंद्रपुरात आले. डोळ्याच्या तपासणीसाठी ते शासकीय महाविद्यालयात गेले. नेत्र विभागातील डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्याला कायमस्वरूपी अंधत्व आल्याचे नमूद केले. त्यानंतर पीडित कुटुंबीय डॉ. सोनारकर यांच्याकडे अंधत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी असता, तुमचा उपचार नागपुरात झाला. तिथून प्रमाणपत्र घेण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे यांच्या आदेशाला केराची टोपणी दाखवत, पीडितास डॉ. सोनारकर यांनी अंधत्व प्रमाणपत्र न दिल्याचा आरोपही गावतुरे यांनी केला आहे.

प्रमाणपत्र देण्याचा अधिकार शल्य चिकित्सकांना: डॉ. सोनारकर

कुणालाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा जिल्हा शल्य चिकित्सक यांचा आहे. मी तपासणीचे जे प्रमाणपत्र दिले, त्यात या रुग्णाच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा आहेत. हाड तुटले आहे. वन्यजीवाने केलेला हा गंभीर हल्ला असल्याचा तसेच त्यांच्या डोळ्याला झालेल्या इजेमुळे त्यांची द्दष्टी काही प्रमाणात निकामी झाल्याचाही उल्लेख केला आहे. मात्र, ती द्दष्टी किती टक्क्यांनी कमी झाली, हे मी ठरवत नाही, तर ते काम जिल्हा शल्य चिकित्सकांचे आहे. तेच अपंगत्वाचे प्रमाणपत्रही देत असतात. त्यामुळे यात माझा काहीच दोष नाही. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे, असे स्पष्टीकरण डॉ. भास्कर सोनारकर यांनी तभाकडे व्यक्त केले.