धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यासाठी अनुयायी उतरले रस्त्यावर

दीक्षाभूमी खुली करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर : दीक्षाभूमी खुली करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.

1956 मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महानगरातील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. तेव्हापासून आजवर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित केला जात आहे. पण, मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमांवर बंदी घातल्या गेली. त्यामुळे येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शासनानेच बंदी घातली. त्यामुळे आंबेडकरी अनुयायी शांत होते. घरीच पंचशील म्हणून धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा केला.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे खुली करण्यास परवानगी दिली. पण, दीक्षाभूमी खुली करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमी खुली करण्यात यावी, यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयार मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दीपक केदार, रूपेश निसरकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.