पोलिस उपनिरीक्षक विनोद तिवारी यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या करंजी येथील महामार्ग पोलिस चौकीवर कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक विनोद तिवारी यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभर त्यांनी नक्षलविरोधी पथकात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

श्री तिवारी यांना यापूर्वी सन २०१५ मध्ये राष्ट्रपती पदक मिळाले होते. नक्षलवादी विरोधी पथकात त्यांनी २० वर्षे काम केलेले आहे. आजवर त्यांना ६०० पेक्षा अधिक शोर्य पुरस्कार मिळालेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असताना खडतर सेवा केल्याबद्दलही त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्या उत्कृष्ट विशेष कामगिरीने त्यांनी आजवर काम केलेल्या जिल्ह्यात आपली छाप सोडलेली आहे.

पोलिस दलात विशेष कामगिरी करणाऱ्यांना आधी राष्ट्रपती पदक दिले जाते, जे तिवारी यांना २०१५ मध्ये देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती पोलिस पदक दिले जाते, जे की त्यांना नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. नक्षलविरोधी पथकात काम करताना त्यांनी आजवर चंद्रपूर, नागपूर, इटारसी, रायपूर, वर्धा येथे कामगिरी करीत कित्येक नक्षलवाद्यांवर कारवाई केलेली आहे. सन २०१९ पासून ते यवतमाळ जिल्ह्याच्या करंजी येथील महामार्ग पोलिस चौकीवर कर्तव्य बजावत आहेत.

करंजी येथेही दैनंदिन कामांव्यतिरिक्त जनजागृतीची कामे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. रस्ता सुरक्षेसह नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचेही काम ते नियमितपणे करत आहेत. त्यांना जाहीर झालेल्या शौर्य पुरस्काराबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक कर्मचारी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज विशेष कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.