सामान्यांना जोरदार झटका! LPG गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरात पुन्हा एकदा वाढ केल्याचं समोर आलं आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील घरगुती सिलिंडरच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर 859.5 रुपये झाला आहे. ही दरवाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू होणार असल्याचे पेट्रोलियम कंरन्यांनी सांगितले आहे.

कोलकत्तामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 886 रुपये, मुंबईमध्ये 859.5 रुपये तर लखनऊ 897.5 रुपये एवढा आहे. याचबरोबर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि पंधराव्या तारखेला एलपीजी गॅसच्या दरांचा आढावा घेत असतात. यापुर्वी 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढविले होते. यानंतर 1 ऑगस्टलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 73.5 रुपयांची वाढ केली होती. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आली नव्हती.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने केंद्र सरकारवर विरोधी पक्ष आणि सामन्या नागरिक टीका करत आहेत. मात्र, केंद्र सरकार या वाढणाऱ्या किंमती आंतरराष्ट्रीय किंमतींवर ढकलत आहे.