दारू नको, दूध प्या आंदोलनातून महिला आक्रमक

 • वादग्रस्त दारू दुकान बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

• ठराव विचाराधीन असताना दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिले

• गडचांदुर नगर परिषद वादाच्या भोवऱ्यात

चंद्रपूर  : जुलै महिन्यात CL – 3 देशी दारूच्या दुकान स्थलांतरणास ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव बेकायदेशीर असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची वाट न पाहता बेकायदेशीर ठरावाच्या आधारे देशी दारू दुकान सुरू झाले असून नगर परिषद , जिल्हा प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने महिलांचा राग अनावर झाला. हे वादग्रस्त दुकानालगत वाचनालय व महाविद्यालय असताना प्रशासनाने दुकानाला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज शुक्रवारी (17 सप्टेंबर 2021) ला महिलांनी ‘दारू नको , दूध प्या ‘ असे जनजागृती करणारे आंदोलन करत लक्ष वेधून घेतले.

३ सप्टेंबरला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे याबाबत नगरसेवक सागर ठाकूरवार, नगरसेविका वैशाली गोरे, नगरसेविका किरण अहिरकर यांनी दावा दाखल केला. त्यानंतर २० सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूनवाई ठेवली आहे. दरम्यान नुकतेच दोन – तीन दिवसाआधी हे दुकान सुरू झाले . याआधी उत्पादन शुल्क कार्यालय चंद्रपूर येथील अधिक्षक व अपर जिल्हाधिकारी यांना महिलांनी निवेदन देखील दिले आहे. तसेच २५ ऑगस्ट ला गडचांदूर नगर परिषदेसमोर महिला एक दिवसीय उपोषण देखील केले.

१७ ऑगस्ट २०११ च्या शासन निर्णयानुसार देशी दारू दुकानाची अनुज्ञप्ती नगरपरिषद हद्दीत स्थलांतरित करताना प्रभागातील ५० टक्के मतदारांची किंवा महिलांची सहमती घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही सहमती देशी दारू दुकानदाराने घेतली नसताना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव पारित करणे बेकायदेशीर आहे. तसेच, देशी दारू दुकानापासून काही अंतरावर महाविद्यालय व वाचनालय देखील आहे. त्यामुळे दुकान सुरू झाल्यास युवकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतील. महिलांवर होणारे अत्याचार देखील वाढतील. बेकायदेशीर ठरावाच्या आधारे दुकान सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक ५ मधील महिलांनी मागणी असल्याची माहिती शिवसेनेच्या नगरसेविका सौ. वैशाली सू. गोरे यांनी दिली. याबाबत पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी यांना रीतसर कळवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

गडचांदूर नगरपरिषदेच्या हद्दीत सर्व्हे नंबर ३६६/१, मालमत्ता क्र. ९८८ च्या इमारतीत स्थलांतरित होणाऱ्या देशी दारू दुकानास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे म्हणून ठराव बहुमताने पारित झाला आणि ठराव कायम होण्याआधीच ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दारुप्रेम लक्षात आल्याचे मत नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी मांडले. उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी याबाबत काय पाऊले उचलतात यांकडे लक्ष लागले आहे.