चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील सोनोग्रॅाफी कक्ष सुरू

यंग चांदा ब्रिगेडचे प्रयत्न, जिल्हाभरातील रुग्णांना दिलासा

चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष बंद आहे. याबाबत बाहेर गावातून आलेल्या रुग्णांना अडचण येत असल्याची तक्रार यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाली. त्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सोनोग्राफी कक्ष रुग्णांसाठी सुरू करण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक पंकज गुप्ता, राशिद हुसेन, करणसिंह बैस, गौरव जोरगेवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील सोनोग्राफी कक्ष हे अधूनमधून नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार शनिवारी रात्री पुन्हा एकदा समोर आला आहे. गडचांदूर, जिवती, वरोरा येथील काही रुग्ण सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी कक्षात पोहोचले. कक्ष बंद असल्याने त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. अखेर या बाबतची तक्रार एका रुग्णाने आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात जाण्याच्या सुचना केल्यात. यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचल्यानंतर सदर कक्ष बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कक्षाबाहेर रुग्णांच्या रांगा दिसून आल्या. या प्रकाराबाबतची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर यांना दिली.

मात्र, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. अशोक निन्नावरे यांच्याकडे तक्रार केली. जोवर कक्ष सुरू होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यांनतर अधिष्ठाता यांनी संबंधितांना सांगून सोनोग्राफी कक्ष रुग्णांसाठी सुरू केला.