ओबीसींच्या आरक्षणासाठी वज्रमुठ बांधण्याची गरज : मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

 चंद्रपूर येथे पार पडला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसी मेळावा

चंद्रपूर : ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलतो, त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र, कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी बोलतच राहणार. ओबीसींच्या आरक्षणासाठी वज्रमुठ बांधण्याची गरज आहे, असा निर्धार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी ओबीसी विभाग आणि अ. भा. महात्मा फुले समता परिषदतर्फे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात छगन भुजबळ यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरेश्वर टेमुर्डे, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुबोध मोहिते, संपर्क प्रमुख मधुकर कुकडे, प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, म. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, ओबीसी नेता डॉ. अशोक जीवतोडे, शोभा पोटदुखे, राकाँ शहर अध्यक्ष राजीव कक्कड, प्रा. योगेश दुधपचारे आदींनी छगन भुजबळ यांचा सत्कार केला.

यावेळी चंद्रपूर-गडचिरोलीसह आठ जिल्ह्यातील ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणासाठी राज्य सरकारने छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आणि ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत केले. याबद्दल भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भुजबळ म्हणाले, आज ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणार्‍यांना बाजूला करा. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे. न्यायालयीन लढाईदेखील राज्याची सुरू आहे, असे ते म्हणाले. आरक्षणासाठी करावा लागलेला संघर्षदेखील त्यांनी आपल्या भाषणातून मांडला. आज अनेक जण इतिहासाची मोडतोड करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खोटे वारसदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उभे केले जात आहेत. मात्र, जनतेने त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

कुणाचेही अन्न तोडणार नाही: भुजबळ

ज्यांनी लस घेतली नाही, त्या शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य केंद्रातून अन्न उपलब्ध होणार नाही, असा आदेश काढल्याबाबत विचारले असता, लस घेणे आवश्यकच आहे. परंतु, लस घेतली नसेल तरी कुणाचेही अन्न तोडणार नाही. याबाबत संबंधितांशी चर्चा केली जाईल, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी पत्रपरिषदेत दिले. तिन पक्षांना एकत्र येत सरकार म्हणून काम करण्यात अडचणी आहेत. मात्र, त्या किरकोळ आहेत. तसे एका पक्षाचे सरकार असले तरी अडचणी येतातच. त्यामुळे सरकार कोणतेही असो, ते जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करणारे असावे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. यावेळी राजेंद्र वैद्य आणि डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते.