चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; राजस्थानमधील तिघांना अटक

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पिंपळगाव (शिंगरू) या गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून राजस्थानमध्ये नेले व विवाह लावून दिल्याची तक्रार मुलीच्या पित्याने वरोरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानंतर वरोरा पोलिसांच्या एक पथकाने राजस्थान गाठून तिघांना अटक केली व मुलीलाही गावात सुखरूप आणले. रामस्‍वरूप केसरीलाल बरवा (वय ३२), छोटूलाल माधवलाल बरवा आणि तस्वीर छोटूलाल बरवा अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव (शिंगरू) येथील एका अल्पवयीन मुलीला रामस्वरूप केसरीलाल बरवा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवस त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. मुलगी त्याच्या आमिषाला बळी पडली. रामस्वरूप बरवा याने अल्पवयीन मुलीस राजस्थान राज्यातील शाडोल (ता. विटवा, जि. कोठा) या गावी नेले. काही दिवस घालविल्यानंतर त्या मुलीसोबत विवाह करण्यात आला.

इकडे पिंपळगावात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलाने सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा काहीच पत्ता लागला नाही. तिच्या मैत्रिणीची विचारपूस केली असता त्यांचे प्रेमप्रकरण समोर आले. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार पित्याने वरोरा पोलिस ठाण्यात केली होती. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी रामस्वरूप बरवा राहत असलेले राजस्थानीतील कोठा गाव गाठले. तेथून रामस्‍वरूप केसरीलाल बरवा, छोटूलाल माधवलाल बरवा, तस्वीर छोटूलाल बरवा या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास वरोरा पोलिस करीत आहे.