महानगर पालिका स्थायी समितीच्या सभेत वाचन न करताच २३ विषयांना मंजुरी

• विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
• दहा मिनिटांत 23 विषयांना मंजुरी
• नव्या स्थायी समितीची पहिली सभा वादग्रस्त
• नवीन सदस्यांच्या परिचयालि मनपाने दाखविला ठेंगा

चंद्रपूर : महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत दहा मिनिटात तब्बल २३ विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवनियुक्त सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पहिलीच सभा वादग्रस्त ठरली.

स्थायी समितीमध्ये नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती झाली. अध्यक्षपदी सत्ताधारी पक्षाचे संदीप आवारी यांची अविरोध निवड झाली. आवारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (22 ऑक्टोबर) ला स्थायी समितीची पहिली सभा पार पडली. या सभेला महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे उपस्थित होते. मात्र नवनियुक्त सदस्यांची पहिलीच सभा वादग्रस्त ठरली. विषयपत्रिकेवरील अर्धे विषयांचे वाचन करण्यात आले नाही. वाचन न करता विषयांना मंजुरी देण्यात आली असा आरोप स्थायी समिती सदस्य नंदू नागरकर व पप्पू देशमुख यांनी केला आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या तीन निविदा आजच्या विषयपत्रिकेवर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांची परिचय सुद्धा सभेमध्ये घेण्यात आला नाही. अचानक सभा सुरू झाल्यानंतर अर्ध्या विषयांचे वाचन करण्यात आले नाही, असा आरोप नगरसेवक देशमुख यांनी केला.
मागील दोन वर्षांपूर्वी उज्ज्वल कंन्स्ट्रक्नशचे काम रद्द केल्यानंतर पाणीपुरवठाच्या कामात बाबत ई- निविदा काढण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. ऑफलाईन निविदा करून त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रकार मागील दोन वर्षापासून सुरू आहे. विशिष्ट कंत्राटदारांना लाभ पोहोचवून त्यांच्यासोबत सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी भागीदारी करीत असल्याचा आरोप देशमुख आणि नागरकर यांनी केला.