मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २५ अधिकाऱ्यांचे हाेणार निलंबन? गृहखात्याकडे प्रस्ताव

मुंबई : खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याकडे पाठविला आहे. त्यांच्यासह २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठविला आहे.

संजय पांडे यांनी गृहखात्याकडे पाठवलेल्या यादीत परमबीर सिंग यांच्यासह वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपी असलेले चार उपायुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. गृहखात्याने या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीप्रकरणातील पाच गुन्हे दाखल केले आहेत. सिंग यांच्याविरुद्ध चौकशी समितीने अटक वॉरंटही बजावले आहे. तरीही सिंग अद्याप पसार आहेत.

या प्रकरणी पोलिस खात्याने सविस्तर चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला आहे. याबाबत एका वृत्तपत्राने अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले असून त्यात ते अधिकारी म्हणतात, ‘प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणार नाही.

एखाद्या अधिकाऱ्यावर गुन्हा असेल तर त्यातील त्याची नेमकी भूमिका समजायला हवी. एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असू शकते, मात्र काहीचा नाममात्र संबंध आलेला असू शकतो.

मुख्‍यमंत्र्यांकडे जाणार फाईल

पोलिस महासंचालकांनी पाठवलेल्या प्रस्तावात उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक पदावरील क्लास वन अधिकारी आहेत. त्या संदर्भातील फाइल मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी लागणार आहे. त्यामुळेच पोलीस महासंचालकांना सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे.

परमबीर सिंग यांच्यासह अन्य १६ पोलिसांविरुद्ध पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी अकोला पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ जुलै रोजी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. तब्बल २५ सुपर क्लासवन अधिकाऱ्यांचे निलंबन करणे ही मोठी कारवाई असेल. याचा परिणाम अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर होऊ शकता.मात्र, परमबीर सिंग यांच्यावरील कारवाई अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.