चंद्रपूरात आता फ्लेम फोटोमीटर संयंत्रामुळे पाणी गुणवत्ता तपासणी

0
106
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक : सिईओ राहुल कर्डिले

चंद्रपूर : फोटोइलेक्ट्रिक फ्लेम फोटोमीटरमुळे पाण्यातील धातूचे आयनची तपासणी होऊन त्यात सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियम चे प्रमाण किती आहे, याची माहिती त्वरीत मिळते. यामुळे पाण्याची गुणवत्ता सटिकतेने काढता येईल व पाण्यातील दोष माहिती झाल्यास संबंधीत पाणी स्रोतावर आवश्यक उपाययोजना करून दुषित पाण्यामुळे पसरणाऱ्या संभाव्य साथरोगास प्रतिबंध करता येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी प्राधान्याने घेता येईल. यासाठी अद्यावत उपकराणांद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.
जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, चंद्रपूर, येथे नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत फ्लेमफोटोमीटर संयंत्र बसविण्यात आले असून या संयंत्राचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे हस्ते आज फित कापून करण्यात आले. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक मंगेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, चंद्रपूर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजयता सोलंकी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. योगेंद्रप्रसाद दुबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी पाण्यातील विविध मानकाचे प्रमाण, फ्लोराईडयुक्त पाण्याची तपासणी, तालुकास्तरावरील पाणी तपासणी प्रयोगशाळा, पाण्यातील अणुजैविक व रासायनिक घटक तसेच टीसीएल पावडर च्या तपासणीची काय सोय करण्यात आली आहे, याबाबत माहिती घेतली. पाणी तपासणी प्रयोगशाळा अद्यावत उपकरणांद्वारे सुसज्ज ठेवण्यात यावी व यासाठी आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.नवीन फ्लेम फोटोमीटरचे संयंत्र जिल्हास्तरावर सर्वप्रथम चंद्रपूर येथे बसविण्यात आले असून अशा प्रकारचे संयंत्र यापुर्वी केवळ विभागीय स्तरावरच उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्ह्यात खडकांची वैविधता जास्त प्रमाणात असल्याने नियमितपणे पाण्याची गुणवत्ता तपासणी आवश्यक असल्याचे प्रादेशिक उपसंचालक मंगेश चौधरी यांनी सांगितले.

जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही व वरोरा या सात ठिकाणी पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सन 2020-21 मध्ये मान्सुनपुर्व एकूण 9720 पाणी नमुने तपासण्यात आले त्यापैकी 9111 योग्य तर 609 नमुने अयोग्य असल्याचे आढळले तर मान्सुनोत्तर 8474 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 8265 योग्य तर 209 नमुने अयोग्य आढल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजयता सोलंकी यांनी सांगितले. 22 मार्च या जागतिक जल दिनानिमित्त 22 ते 27 मार्च दरम्यान भूजलाचे महत्व विशद करणारे विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या पाठपुराव्यामुळे या संयंत्रासाठी निधी उपलब्ध झाला असून या संयंत्रामुळे पाण्यातील सोडियम व पोटॅशियमची माहिती तातडीने होईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला कनिष्ट भूवैज्ञानिक कुणाल इंगळे, किशोरी केळकर, पवन वनकावार तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.