पालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा : करोना काळात खासगी शाळांचे १५ टक्के शुल्क कमी करण्याचा निर्णय

मुंबई : करोना विषाणू महासाथीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. करोना विषाणू संकटाच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश शाळा टाळेबंद आहेत. विषाणू संकटामुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्या पालक वर्गाकडून शाळांनी शुल्कामध्ये कपात करावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत आज राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खासगी शाळांनी शुल्कामध्ये १५ टक्के कपात करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांना आता खासगी शाळांची फी ८५ टक्के भरावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. यापूर्वी राजस्थान सरकारने देखील असाच निर्णय घेतला होता.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1420404298089828356?s=19
याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. शाळांचे शुल्क कमी करण्याचा अधिकार सरकारला नसला तरी करोना महासाथीमध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत. त्यामुळे या कालावधीतील शुल्क आकारणीचा अधिकार सरकारकडे घेणार असल्याची तरतूद  अध्यादेशात असल्याचे समजते.