OBC आरक्षणासाठी एक दिवसाचे स्वतंत्र आधिवेशन घेणार : विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणासाठी विधानसभेत एक दिवसाचे स्वतंत्र आधिवेशन घेऊ अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मराठा,मुस्लिम, धनगर आणि ओबीसींना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय उन्नतीसाठी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सोलापुरात ओबीसींच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडेट्टीवार बोलत होते.

विशेष अधिवेशन घ्यायला मुख्यमंत्री यांना सांगू, जो विरोध करेल तो कायमचा मरेल. निवडणुका पुढे ढकलू, इंपेरिकल डेटा गोळा करु, पण ओबीसी आरक्षण देवू. तुमच्यासाठी विरोधीपक्षनेते देखील तेवढेच आक्रमक होते आणि मुख्यमंत्री तितकेच आक्रमक होते, असे वडेट्टीवार म्हणाले.

2008 चा जीआर पुनर्जीवित करणार असून सरपंच, ग्रामसेवकच जात कोणती ते ठरवतील. शाळेत गेले नाहीत म्हणून पुरावा नाही, म्हणून दाखले नाहीत. महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची क्षमता या समजात आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात 2 ओबीसी हॉस्टेल उभे करावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. भटके विमुक्त समाजातील विद्यार्थी आता सीबीएसई स्कूलमध्ये जाणार. प्रत्येक विद्यार्थ्याला 70 हजार रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे बहुरुप्याचा मुलगा खोटा ड्रेस घालून नव्हे तर खरा पोलीस इंस्पेक्‍टर होणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा ही लढाई कायम ठेवत ओबीसी आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळविण्यासाठी आपण ओबीसींसोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले. नरसय्या आडम आणि “उपरा’कार लक्ष्मण माने यांनी भाजपवर टीका केली.