पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी

सोयाबीन, कापूसासह धानाचे नुकसान, आर्थिक मदत देण्याची माजी सरपंच पिंपळकर यांची मागणी

चंद्रपूर : यंदा चांगल्या पावसाचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले. त्यानुसार खरीपात सुरुवातीपासून पाऊस चांगला झाला. यामुळे पिके डौलाने उभी होती. हातात चांगला पैसा पडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी पिपरी (धानोरा) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पारस पिंपळकर यांनी केली आहे.

चंद्रपूर तालुक्यातील मारडा, धानोरा, शेणगाव, सिदूर, वेंडली, देवाडा, शिवणी, उसगाव, पांढरकवढा, वडा यासह अन्य गावांत कापूस, सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडला. त्यामुळे हाती चांगले उत्पन्न येण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, मधल्या काळात जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली. चंद्रपूर तालुक्यातील अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हाच पाऊस आता पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. कापूसाला बोंड, तर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहेत. मात्र, सतत पाऊस सुरू असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे परत द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर यांनी केली आहे.

कापूस, सोयाबीनचे पीक चांगल्या स्थितीत होते. मात्र, सततच्या पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी दोन्ही पिकांचा विमा काढला आहे. त्यांना तातडीने विम्याची रक्कम तातडीने द्यावी – पारस पिंपळकर, ग्रामपंचायत सदस्य पिपरी