चंद्रपूरात बंद पाळून लखीमपूर घटनेबाबत केंद्र सरकारचा तिव्र निषेध

• चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे वाहन रॅली
• खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती

चंद्रपूर : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकरी नरसंहार घडवून आणणाऱ्या भाजप सरकारविरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवारी (ता. ११) महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. त्यानुसार आज सोमवारी चंद्रपूर बंद पाडण्यात आला. बंदमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सक्रियपणे सहभाग नोंदविला. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार बाळू धानोरकर, शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून वाहन रॅली काढण्यात आली. शेतकऱ्यांवर वाहन चढविण्याचा संतापजनक प्रकार केंद्रातील भाजपच्या एका मंत्रीपुत्राने केला. यात काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या प्रकारानंतर केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील योगी सरकारविरोधात देशभर निषेध नोंदवित संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सहकारी मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालया समोर एकत्रित येत केंद्र सरकार, योगी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर वाहन रॅली काढण्यात आली. शहरातील गांधी चौक, जयपूर गेट, प्रियदर्शिनी चौक, जनता कॉलेज चौक, बंगाली चौकमार्गे मार्गक्रमण करीत रॅलीचा समारोप गिरनार चौकात झाला.

रॅलीत प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव शिवा राव, प्रदेश सचिव विजय नळे, कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, माजी महापौर संगीता अमृतकर, नगरसेविका सुनीता लोढिया, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य-ठेमस्कर, नगरसेविका संगीता भोयर, झोन सभापती अमजद अली, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, उमाकांत धांडे, माजी सभापती संतोष लहामगे, प्रवीण पडवेकर यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मयूर शिवभोजनालयाची तोडफोड

आज सोमवारी उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे शेतकऱ्यांना भाजपच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याच्या निषेधार्थ तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना तुरुंगात डांबले याच्या आरोप करीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंद दरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरातील बस स्टॅन्ड समोर असलेल्या “मयूर शिवभोजनालयात” शिरून शिव भोजनालय बंद करण्यात यावे यासाठी तोडफोड केली.