मुंडन करून कामगारांनी केला गोपानी कंपनीच्या अन्यायकारक भूमिकेचा निषेध

चंद्रपूर : कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोपानी स्पंज आर्यन कंपनीच्या कामगारांचे 8 व्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. जिल्हा प्रशासन व गोपानी कंपनीच्या निषेधार्थ कामगारानी गुरूवारी मुंडण आंदोलन करून लक्ष वेधले. संजय बुद्धलवार, चंद्रभान झाडे, रमेश जुनघरे, रमेश आरपल्ली, रमेश उरकुडे, नरेंद्र गुरनुले, महादेव देशमुख, परशुराम निखाडे, श्रीकष्ण पिदूरकर, शंकर देशमुख, संजय बोंढे, अशोक खंडाळकर आदी कामगारांनी मुंडण केले.

गोपानी कंपनीने कुठलीही पूर्वसुचना न देता मागील 17 वर्षापासून कार्यरत 500 कामगारांना कामावरून कमी केले. या कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी कामगार आयुक्तांसोबत बैठक पार पडली. कामगार आयुक्तांना कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे निर्देश दिले. पण, कंपनीने अद्याप कामगारांना कामावर घेतले नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी शासन-प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांना मोर्चा काढला. पण कुणीही दखल घेतली नाही.

त्यामुळे अखेर कामगारांना अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला. नितीन खरतड, नरेंद्र वाकडे, प्रशांत पिंपळे, विजय मासिरकर, शामसुंदर मेश्राम हे पाच कामगार आठव्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन बाजार समितीचे सभापती तथा कामगार नेते दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.