Rain Updates : राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो.

आज आणि उद्यासाठी कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज आहे. मुंबईतही पुढील तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दक्षिण मराठवाड्यात प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ, पश्चमि विदर्भात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान देखील सर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो.