धक्कादायक : एकच कुटुंबातील चौघांची हत्या; ९० वर्षाची म्हातारीच राहिली जिवंत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गोंदिया : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता ड्रायव्हर वाहन घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला घरात ४ मृतदेह दिसून आले. एकाच कुटुंबातील चौघांचा खून हा व्यवसायातून झाला की संपत्तीतून झाला हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनाचा उलगडा झाला नाही. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये अनेक आरोपींचा समावेश असावा असा कयास लावला जात आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रेवचंद डोंगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करतात. रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून ठार केले.

मालता रेवचंद बिसेन ह्या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या हाेत्या. बहिण पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व भाऊ तेजस रेवचंद बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला. गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता. आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने ही हत्या नाही आत्महत्या वाटावी यासाठी रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता.

घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे घटनास्थळावर दाखल झाले. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल हा घटनास्थळपासून घराच्या वऱ्हाड्यांतच १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडाच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले.

९० वर्षाची म्हातारीच राहिली जिवंत

रेवचंद डोंगरु बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन ह्या आजघडीला ९० वर्षाच्या आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या. आरोपी मागच्या दारातून आले आणि त्यांनी या चौघांना संपविले तरी खेमनबाई यांना या घटनेचा सुगावा नसावा. या म्हाताऱ्या खेमनबाई यांना या घटनेची काय माहिती आहे यावरूनही पोलीस धागेदोरे जोडतील.