Breaking : यंदाही गोविंदा दहीहंडीला मुकणार! ठाकरे सरकारचा ‘मोठा’ निर्णय

करोना विषाणूचे संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी संघांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात दहीहंडीला परवानगी नाकारण्यामागची कारणे सांगितली.

राज्यात करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील दहीहंडी संघानी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने यंदा काही प्रमाणात तरी दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने केली होती. गणेशउत्सवाप्रमाणे दहीहंडीसाठी देखील नियम आखून द्यावेत, गोविंदांचे लसीकरण, जागेवरच मनाची दहीहंडी फोडण्यास परवानगी अशा मागण्या देखील दहीहंडी संघांच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली होती.

मात्र, दहीहंडी उत्सव साजरा केल्यास करोना विषाणू संसर्गाचा धोका बळावेल असा इशारा टास्क फोर्सने दिला असल्याचे सांगत ठाकरे सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

‘परवानगी दिली आणि करोनाचा प्रसार वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसं ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केलं आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचं आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत,’ असं समन्वय समितीने सांगितलं आहे.