Gopani Iron & Power Pvt Ltd कंपनीने 500 कंत्राटी कामगारांना केले कमी

◆ कामगारांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ

◆ उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त कामगारांचा एल्गार

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या ताडाळी Gopani Iron & Power Pvt Ltd या कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता 500 कंत्राटी कामगारांना एका रात्रीतून कामातून कमी केले. त्यामुळे या सर्व कामगारांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या संतप्त कामगारांनी मंगळवार 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मार्चाचे आयोजन केले आहे अशी माहिती ताडाळी एमआयडीसी स्पंज आयर्न कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश दादाजी चोखारे यांनी दिली.

आज चंद्रपूर प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चोखारे यांच्यासह पाचशेपेक्षा अधिक कामगारांनी गोपानी व्यवस्थापनाविरूध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. गोपानी व्यवस्थापनाने जुलै महिन्यात कंत्राटी कामगारांचा अर्धा पगार कपात केला. त्यानंतर कामगारांना कमी करण्यात आले. सहायक कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापन, कंत्राटदार व कामगार संघटना यांच्यात संयुक्त बैठक लावली होती.या बैठकीत सहायक कामगार आयुक्त यांनी सविस्तर चर्चा करून कंपनी व्यवस्थापनाला कामगारांना परत कामावर घ्या व राहिलेले वेतन तात्काळ देण्याची सूचना केली. त्यानुसार कंत्राटदारांनी जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ऑगस्ट महिन्याचा अर्धा पगार कपात केला.

गोपानी व्यवस्थापनाच्या या अशा व्यवहारामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात कामगारांना नोकरीवरून काढल्याने आर्थिक पिळवणूक करित असलेल्या गोपानी व्यवस्थापनाच्या विरोधात कामगार मंगळवारी रस्त्यावर उतरणार आहे. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे चोखारे यांनी सांगितले.