पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट

पिस्तूल जप्त करून पोलिसांनी दिली युवकाला समज

चंद्रपूर : बल्लारपुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एकाने चक्क पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्याकडे तीन नकली पिस्तुले आढळून आली. ती पिस्तुले जप्त करीत युवकाला समज देऊन सोडून दिले.

नरेश एकनाश मेश्राम (२३) असे या युवकाचे नाव आहे. शहरात पिस्तूल बाळगणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. रविवारी सायंकाळी नरेशने चक्क पिस्तूल हातात घेऊन फेसबुक व व्हाॅट्सॲपवर पोस्ट टाकली. या पोस्टने बल्लारपूर पोलीस खडबडून जागे झाले. त्या युवकाला ठाण्यात बोलावून त्याची झाडाझडती घेतली असता ती पिस्तुले नकली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुले ताब्यात घेतली. त्याला चांगलीच समज देऊन सोडून दिले. त्याने ती पिस्तुले ऑनलाइन मागविल्याचे पोलिसांना सांगितले.