चंद्रपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले गंजवॉर्ड. भाजी बाजाराने या वॉर्डाला विशेष ओळख दिली. येथे मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर राबणे हा त्यांचा नित्यक्रम. मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले हे चक्र. त्यामुळे येथिल नागरिकांना सत्कार म्हणजे काय, हे कधी बघितले नाही. त्यामुळे आपल्या लोकांचा सत्कार आपल्या लोकांनी करायचा, या उद्देशातून परिसरातील युवक स्वयंस्फूर्तीने एकत्र आले. गंजवॉर्ड मित्र मंडळाच्या नावाने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. तब्बल दोनशेहून अधिक श्रमजिवी महिला, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. आपल्या लोकांकडून झालेल्या सत्काराने सर्वजण भारावून गेले.
गंजवॉर्ड मित्र मंडळाच्या पुढाकारातून आज रविवारी (ता. २९) मौलाना आझाद चौक येथे हा आगळावेगळा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर महेश मेश्राम, साबीर शेख, विवेक दर्शनवार, सचिन पटकोटवार, धनंजय दानव, सुनील वासमवार उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वॉर्डातील सर्वांची एकमेकांशी चांगली ओळख असते. प्रत्येकजण एक दुसऱ्याच्या सुख, दुःखात सहभागी होतात. त्यामुळे हेच स्नेह, बंधुभाव, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कायम राहावा, आपुलकीचे नाते वृद्धिंगत व्हावे, या उद्देशातून वॉर्डातील युवकांनी आयोजित केलेला कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी परिसरातील दोनशेहून अधिक श्रमजिवी महिला, ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोरोनाने जीव गमावलेल्या वॉर्डातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज साखरकर यांनी केले. संचालन नावेद हुसेन यांनी, तर आभार महेश दर्शनवार यांनी मानले. आयोजनासाठी अनुकेश झबाडे, राजू बेग, बापू बिरे, संकेत डिवटे, रोशन कोडापे, सादिक शेख, शुभम कांबळे, आकाश गुरनुले, गणेश टेकाम, वैभव गुरनुले, नशीब बेग, राकेश झबाडे, राहुल मडावी यांनी सहकार्य केले.
–