सुधीरभाऊंच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणे सौभाग्य :  देवराव भोंगळे

पिपरी  येथे आमदार मुनगंटीवार यांचा जन्मदिन सेवादिन म्हणून साजरा 

चंद्रपूर : समाजातील प्रत्येक प्रश्न समजून घेत त्याची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. लोककल्याणाचा ध्यास आणि कामाचा झपाटा अशी यांची ओळख आहे. त्यामुळे राजकारणातच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात त्यांचे चाहते आहेत. अशा संवेदनशील मनाच्या ऊर्जावान लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे सौभाग्य असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य देवराव भोंगळे यांनी केले.

पिपरी  ग्रामपंचायतीचे  माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पारस पिंपळकर यांच्या नेतृत्वात आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस (ता. ३०) पिपरी येथे सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून  भोंगळे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नीतू चौधरी, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रणजित डवरे, विनोद चौधरी, सरपंच वैशाली माथने, उपसरपंच हरिओम पोटवळे, संतोष मते, सुरेश चौधरी, रंगराव पवार, विठ्ठल भोयर, ग्रामपंचायत सदस्य सुनीता मते, शुभम डोंगे यांची उपस्थिती होती.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावकऱ्यांना  रेनकोट, छत्र्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त पोलिस पाटील डॉ. दिलीप निब्रड, जनता विद्यालयाचे  सेवानिवृत्त मुख्याध्यापक कालिदास बोबडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  तसेच गावातील बॅंकेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नीतू चौधरी यांनी, समाजातील सर्व घटकाला न्याय देण्यासोबतच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार नेहमीच झटत असल्याचे सांगितले. तर, पारस पिंपळकर यांनी, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासारखा लोकप्रतिनिधी लाभणे हे त्या मतदार संघातील जनतेचे भाग्य आहे. असा जनसामान्यांचा लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यात आहे, याचा सर्व जिल्हावासींसाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हणाले. संचालन रंगराव पवार यांनी, तर आभार विठ्ठल भोयर यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.