शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ संस्थांवर ED चा छापा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ – वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने छापा टाकला आहे. बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप देखील गवळी यांच्यावर आहे. तसेच त्यांच्या संस्थेतून काही कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार होती. त्यानंतर ही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर वाशिम जिल्ह्यात ईडीने कारवाई केल्याची चर्चा सुरु आहे.

रिसोड तालुक्यातील यांच्या काही शिक्षणसंस्था आहेत. तिथे आज सकाळपासूनच ईडीचे पथक दाखल झाले आहे. कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. वाशिमच्या देगाव, शिरपूर येथे पाच शिक्षण संस्था यामध्ये काही घोटाळा झालाय का? याची देखील चौकशी केली जात आहे. तसेच नुकतेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत वाशिममध्ये मोर्चा काढला होता. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका शिक्षण संस्थेचे सात कोटी रुपये चोरीला गेले होते, अशी तक्रार होती त्याबाबतही ईडी चौकशी करत आहे. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड प्रकरणी देखील ही कारवाई केल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, बालाजी पार्टीकल बोर्डाबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करीत भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी रिसोड तालुक्यातील देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याला भेट दिली होती. सध्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, तरीही भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी देगाव येथे भेट देण्याचा प्रयत्न केला असता तिथे उपस्थित शेतकरी, महिला व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती. तसेच किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शाई फेकली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि किरिट सोमय्या यांनी तेथून काढता पाय घेतला.