प्राध्यापकांच्या पेन्शनच्या मुद्द्यावर एमफुक्टो आंदोलनाच्या पवित्र्यात

नूटा च्या वतीने प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपुर : महाराष्ट्रात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असलेले अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. या प्राध्यापकांची महाविद्यालयांतील सेवा 25 वर्ष होऊन सुद्धा या प्राध्यापकांना त्यांच्या हक्काची पेन्शन महाराष्ट्र शासन आणि उच्च शिक्षण विभाग चे सहसंचालक नाकारत आहेत. ऑक्टोबर 1992 ते एप्रिल 2000 या काळात नोकरीला लागलेले अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झालेले आहेत, नोकरीला लागते वेळी ते नेट आणि सेट परीक्षा पास नव्हते. यापैकी अनेक प्राध्यापक पुढे नेट आणि सेट सारख्या परीक्षा पास झालेले आहेत किंवा पीएचडी हे डिग्री त्यांनी प्राप्त केली आहे. अशी अनेक प्राध्यापक महाराष्ट्रभर आपल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत, त्यांच्या पेन्शनच्या फाईल महाविद्यालयांच्या वतीने सहसंचालक यांच्या कार्यालयाकडे पाठवल्या जात आहेत, परंतु सहसंचालक अशा प्राध्यापकांना ते नोकरीला लागते त्यावेळी नेट-सेट पास नव्हते, या सबबीखाली त्यांच्या पेन्शन केस परत पाठवीत आहे. असे वक्तव्य सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे पार पडलेल्या प्राध्यापकांच्या सभेत नूटा संघटनेचे सचिव डॉ. विलास ढोणे यांनी केले.

सहसंचालकांच्या या मनमानी कारभाराचे विरोधात महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक मुंबई उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी गेलेले आहेत. सहसंचालक यांच्या विरोधात आणि प्राध्यापकांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठाने आज पर्यंत जवळपास सत्तावीस प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निकाल दिलेला आहे. वीस ते पंचवीस वर्ष महाविद्यालयात सेवा दिल्यानंतर त्यांना तुम्ही पेन्शन कशी काय नाकारू शकता? असा प्रश्न न्यायालयाने सरकारला केलेला आहे. न्यायालयात गेलेल्या प्रत्येकच प्राध्यापकाला न्यायालयाने न्याय दिलेला आहे आणि इतर प्राध्यापकांवर न्यायालयात येण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी सरकारने एक धोरणात्मक निर्णय घ्यावा असा आदेशही दिला आहे. असे असताना सुद्धा उच्च न्यायालयाचे आदेश सरकार मानत नाही, आजही प्राध्यापकांना कोर्टात जाऊनच सेवानिवृत्ती मिळवावी लागते. याबद्दल महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ ( एमफुक्टो) ने वारंवार विनंती करूनही सहसंचालक आणि संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र हे लक्ष देत नसल्यामुळे महाराष्ट्र महासंघाने येत्या चार ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात आंदोलनाची सुरुवात करण्याचे ठरविले आहे.या आंदोलनात जास्तीत जास्त प्राध्यापकांनी भाग घ्यावा असे नुटा च्या वतीने आवाहन करण्यात आले.

प्राध्यापकांच्या या सभेत मंचावर डॉ. पुरुषोत्तम बोरकर, डॉ राजेश खिराणी, प्रा कमलाकर धानोरकर, डॉ जयदेव देशमुख आदींची उपस्थिती होती. सभेला  प्रामुख्याने डॉ योगेश दूधपचारे, डॉ हीतेंद्र धोटे, डॉ नरेंद्र टिकले, प्रा. गोरडे, प्रा कोंगरे, प्रा.  जुमले, प्रा. साकळे व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील इतरही प्राध्यापकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.