त्वरीत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाच्या सचिवांचे आश्वासन
चंद्रपूर : जिल्हयातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम व वसतीगृह बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात 61 कोटी रू. किंमतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले यांना दिल्या.
शासकीय कृषि महाविद्यालय मुल संदर्भात आज विधानभवन मुंबई येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले यांच्यासह बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा नक्षलप्रभावित जिल्हा आहे. याठिकाणी असणारा शेतकरी उत्तम तंत्रज्ञ, उत्तम कृषिज्ञान प्राप्त व्हावा यादृष्टीने मागील सरकारच्या कार्यकाळात मुल तालुक्यातील सोमनाथजवळ शासकीय कृषि महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे, परंतु अद्याप या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी, वसतीगृह बांधकामासाठी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.
यासंदर्भात निधीच्या मागणीचा प्रस्ताव कृषि परिषद पुणे यांच्या मार्फत शासनाच्या बांधकाम प्रस्ताव उच्चस्तर समितीकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. सदर कृषि महाविद्याच्या इमारत बांधकाम व वसतीगृह बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ६१ कोटी रू. किंमतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले यांना दिल्या. याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल, असे आश्वासन कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.
