सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक व्याजाचे आमिष दाखवून 58 लाखांचा चुना

0
210

वणी (यवतमाळ) : अतिरिक्त पैसे मिळतील या लालसेपोटी सेवानिवृत्त शिक्षकाने 58 लाख रुपये गुंतवले आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर फसवणूक करणाऱ्या भामट्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

कन्हैयाकुमार देवनारायण राम रा. नेगुसराय, ता. कमलपुर जिल्हा चांदेली उत्तर प्रदेश असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे तर आनंदराव हरबाजी बोढाले (79) हे गणेशपूर येथील निवासी असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना शेती विक्रीतून 2 कोटी रुपये मिळाले होते. त्या रकमेतून प्रत्येकी 60 लाख रुपये त्यांनी तीन मुलींना दिले व उर्वरित 20 लाख स्वतः जवळ ठेवले. मिळालेल्या रकमेबाबत त्यांनी परिचित असलेले कन्हैयाकुमार यांना सांगितले.

कन्हैयाकुमार याने कोल इंडिया सोसायटी मध्ये गुंतवणूक केल्यास 14 टक्के व्याजदराने पैसे मिळतात अशी बतावणी केली. बोढाले यांनी 12 जुलै 2019 ला त्याचेवर विश्वास ठेवून 8 लाख रुपये दिले. कन्हैय्या याने कोल इंडियात पैसे भरल्याची पावती आणून दिली. त्यानंतर बोढाले व त्यांच्या मुलींनी वेळोवेळी पैसे दिले. तर तो भामटा वेळोवेळी बनावट पावत्या आणून देत होता.

कालांतराने बोढाले यांना या व्यवहाराबाबत संशय आल्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. कन्हैया यांनी 10 दिवसात पैसे परत करतो म्हणून सांगितले. पण तो टाळाटाळ करीत होता. तर त्याचा मोबाईल नंबर बंद येत असल्याने संशय बळावला.आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच वणी पोलिसात कन्हैयाकुमार याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भादवि कलम 406, 420, 468, 471 नुसार गुन्हा नोंद केला आहे.