कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे शोषण थांबवा : खासदार बाळू धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कोरोनाचा उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करा

वणी , आर्णी विधानसभा क्षेत्रातील कोरोना प्रादुर्भाव उपायोजना बाबत आरोग्य अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या सूचना

यवतमाळ : जगात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कहर केला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील भार येत आहे. सध्या वणी व आर्णी विधानसभेत ज्या आरोग्य व्यवस्था आहेत. त्या कमी पडता कामा नये त्याकरिता कोरोनाचा उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करा तसेच रुग्णांना उत्कृष्ठ उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर आरोग्य यंत्रणेला केले आहे.

त्यासोबतच कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णाचे सुरु असलेले शोषण थांबविण्याची गरज आहे. यवतमाळ जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत अमृत मेडिकल्स मधून कोविड रुग्णांसाठी लागणारे रेमडिसिव्हिर, अँटिव्हायर्ल्डरग्स, अँटिबायोटिक्स, ट्याबलेट्स तात्काळ मागणीपत्र पाठून साठा मागवावा. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरात औषधी उपलब्ध होतील. त्यासोबतच रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार व एच. आर. सी. टी स्कॅन टेस्ट मधील लूट थांबविण्यासाठी दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करावे. आयसीयू , ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण तात्काळ करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या. याबाबत निवेदनाच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे कोविड प्रतिबंधात्मक लस, ऑक्सीजन व रेमडीसीव्हिंर मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची विनंती केली.
त्यासोबतच त्यांनी भ्रमणध्वनीवरून वणी, आर्णी विधानसभेतील परिस्थितीचा आढावा देखील घेतला. त्यात पांढरकवडा – केळापूर उप विभागामार्फत पांढरकवडा, घाटंजी, आर्णी या भागात ग्रामीण क्षेत्रात देखील लशीकरण केंद्रे सुरु असून आरटीपीसीआर तपासणी सुरु आहे. पांढरकवडा विभागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शहरी व ग्रामीण भागातील एकूण १७४९ असून बरे झालेले १५४५ रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या २९ आहे. ग्रामीण व शहरी भागात पांढरकवडा उपविभागात एकून १३ कंटेनमेंट झोन आतापर्यंत घोषित झाले आहेत.

वणी उपविभाग अंतर्गत वणीसह शिरपूर, कोळगाव, कायर व राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड कोविड रुग्णांचे लसीकरण सुरू असून भाल्लर, सिदोला, घोन्सा, राजूर, चिखलगांव व सावर्ला येथून १४४०७ रुग्णांना लसीकरण करण्यात आले. आरटीपीसीआर तपासण्या देखील सुरूच आहेत.
वणी येथील सुगम हॉस्पिटल आरोग्य विभागाने अधिग्रहीत केले असून यात १६ ऑक्सिजन व ४ आयसीयू बेडची सोया आहे. तसेच ट्राम केअर येथे नार्मल बेड ६० तर ऑक्सीजन चे २० बेड ची सोया आहे. मारेगाव येथे ५० बेडची सोया करण्यात आली असून परसोडा येथे १३० बेडची व्यवस्था लवकरच करण्यात येत आहे. वणी उपविभागात एकूण ४६५ कंटेनमेंट झोन असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १८३४ असून बरे झालेले रुग्ण १५११ आहेत. मृत्यू संख्या २७ असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान थांबविण्यासाठी सर्वानी योग्य नियोजन करून टीम वर्क करून रुग्णाची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.