चंद्रपुरात १२ प्रतिष्ठनांवर मनपाची कारवाई ; ९३ हजारांचा दंड वसूल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १२) मनपाचे उपायुक्त विशाल वाघ यांच्या उपस्थितीत चंद्रपूर शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, श्री. पंचभुते व झोन २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

शहरात दुपारी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. परंतु दिलेल्या वेळेनंतर सुरू असलेल्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. यात सोसायटी ट्रेडर्स कडून २० हजार, गुगोल कलेक्शन १० हजार, श्री गणेश साडी सेंटर ८ हजार, डायमंड ग्लास सुरू असल्याप्रकरणी ५ हजार, अनिकेत जैन 5 हजार, नयन बडवाईक २ हजार, रमेश मून ५ हजार, शिवशक्ती प्रिंटिंग प्रेस १५ हजार, सिकटेक टाईल्स १५ हजार, बेले हार्डवेअर २ हजार, पियुष अग्रवाल ३ हजार,शशांक अग्रवाल ३ हजार असे एकूण 93 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरातील काही व्यापारी दुकानाचे शटर लावून व्यापार करताना आढळले, त्याच्यावरही मनपा उपायुक्त, सहायक आयुक्त आणि टीम ने कडक कारवाई केली. तसेच यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हा दाखल करण्याचे सूतोवाच देखील मनपा ने केले. यासोबतच किराणा दुकानदार व सुपर मार्केट व्यावसायिकांना सुद्धा सूचना देण्यात आल्या की, ११ वाजेनंतर दुकान बंद करण्यास विलंब झाल्यास कारवाई करण्यात येईल.