60 हजारांची लाच घेताना आरपीएफ महिला उपनिरीक्षक अटकेत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कारवाईत तडजोड करण्यासाठी केली मागणी

चंद्रपूर : रेल्वे प्रवाशाला एका खासगी संगणक संचालकाने प्रवासाकरिता ऑनलाइन तिकीट काढून दिले. मात्र, सदर तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित संगणक संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तडजोड करण्याच्या कामाकरिता ६० हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला उपनिरीक्षकास रंगेहात अटक करण्यात आली. गोपिका मानकर असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे.

रेल्वे सुरक्षा बलामध्ये गोपिका मानकर या उपनिरीक्षकपदावर आहेत. त्या सध्या वरोरा येथील रेल्वे स्थानकावर कार्यरत आहेत. भद्रावती येथील खासगी संगणक संचालकांनी एका महिन्यापूर्वी एका रेल्वे प्रवाशास रेल्वे प्रवासाकरिता ऑनलाइन तिकीट काढून दिले. याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना झाली. तपासात सदर तिकीट नियमबाह्यरित्या काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संगणक संचालकावर रेल्वे सुरक्षा बल वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात तडजोड करण्याकरिता उपनिरीक्षक गोपिका मानकर यांनी एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. मात्र, संगणक संचालकाने साठ हजार रुपये देण्याचे मान्य केले. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबतची तक्रार केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंध नागपूर यांच्याकडे केली. त्यानुसार वरोरा रेल्वे स्थानकावर ६ ऑक्टोबरला सापळा रचण्यात आला. रात्रीच्या सुमारास ६० हजार रुपयांची लाच घेताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले.
सदर कारवाई नागपूर येथील केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक एम. एस. खान यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी एस्सार चौगुले, पोलिस निरीक्षक कल्याणी हुमणे, पोलिस निरीक्षक निरज गुप्ता, कविता लासरकर, उपनिरीक्षक विनोद कराळे, कोमल गुजरकर, संदीप ढोबळे, सी. एम. बांगडकर, कीर्ती बावनकुळे, राजेश डेकाटे यांच्या पथकाने केली.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleउद्या मध्यरात्रीपासून वाहने उभे ठेवण्याचा वाहतूकदारांचा निर्णय
Editor- Manoj kumar Kankam 9823945554/ 9423845554