मनपात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी सोहळा
चंद्रपूर : जेव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तेव्हा क्रांतिवीरांनी प्राणाची पर्वा न करता झुंज दिली. आज आपण कोरोनाच्या संकटात जगत आहोत. डॉक्टर, परिचारिका यांच्यासह रुग्णसेवेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काम करणारे कोरोना योद्धे आपले जीव धोक्यात घालून लढा देत आहेत. या भयावह संकटाला तोंड देण्यासाठी कोरोना योद्धे आजच्या युगातील क्रांतीवीर आहेत, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, मनपाचे आयुक्त राजेश मोहीते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते गांधी चौकस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौरांनी मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व जटपुरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा स्मारक येथे भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, इंग्रजाविरोधात दीडशे वर्षाचा संघर्ष ऐतिहासिक आणि अजरामर क्रांतीची गाथा ठरली. आपल्या मायभूमीला जुलमी आणि गुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेकजण फासावर गेले. अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या. लाठ्या खाल्या. पण हार मानली नाही. त्यांचे बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही. आज कोरोनाविरुद्धच्या युद्धातही जे लढा देत आहेत, त्यांनाही सलाम करते. सर्वांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हरवूया, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.