निधी अभावी कोरोना रुग्णांचा भोजन पुरवठा बंद होण्याची शक्यता

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कंत्राटदाराने भोजन पुरवठा बंद करण्याचे मनपा प्रशासनाला दिले पत्र

चंद्रपूर : ‘घरी नाही खायला, चला दारू प्यायला’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे.त्याची प्रचिती सध्या चंद्रपूर महानगरपालिकेत येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून निधीचा दुरुपयोग व भ्रष्टाचार केल्याचे अनेक किस्से आजपर्यंत उघडकीस आले.मात्र सध्या कोविडच्या परिस्थिती मुळे सामान्य जनता तसेच संपूर्ण आरोग्य व्यवस्था हतबल झालेली असताना व व्हेंटिलेटर तसेच उपचाराच्या इतर सुविधा अभावी दररोज निष्पाप लोकांचा बळी जात असताना चंद्रपूर महानगरपालिकेने प्रसिद्धीसाठी दर महिन्याला दोन लाख पाच हजार रूपयाचे काम एका एजन्सीला दिले.

आयटी क्राफ्ट नावाच्या एजन्सीला वर्षाला या कामापोटी आता 24 लाख 60 हजार रुपये देण्यात येतील. फक्त प्रसिद्धीसाठी हा खर्च करण्यात येणार आहे. या कामाचा मागील आमसभेमध्ये जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कडाडून विरोध केला होता.मात्र कोरोना आपत्तीमधिल व्यस्ततेचा फायदा घेऊन गुपचूप ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.या निविदा प्रक्रियेत नागपूरची आयटी क्राफ्ट तसेच पुणे येथील पॅक्टीक मिडिया कन्सेप्ट व असिन्त्या सोलुशन्स या एजन्सीजने भाग घेतला होता अशी माहिती आता प्राप्त झालेली आहे.आपल्या जवळच्या एका कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्यासाठी मनपातील पदाधिकारी व प्रशासनाने संगनमत करून ऐन कोरोना सारख्या महामारीमध्ये निधीचा दुरुपयोग करून प्रसिद्धीचा हव्यास पूर्ण करून घेतला असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी मागील चार वर्षात अशा प्रकारे जनतेच्या करोडो रुपयांना चुना लावण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केले असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केला.मनपातील सत्ताधारी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आहेत.प्रशासनाला हाताशी धरून निधीचा वाटेल तसा उपयोग करीत आहे. करोना रुग्णांना क्वारंटाईन सेंटरवर भोजन पुरवण्याचे काम मनपाकडून करण्यात येत आहे. या कामाची देयके रखडल्यामुळे कंत्राटदाराने भोजन पुरवठा बंद करण्याबाबतचे पत्र दोन दिवसापूर्वी मनपा प्रशासनाला दिले.एकीकडे पोटात खायला नसताना दुसरीकडे प्रसिद्धीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे.याविरुद्ध शासनस्तरावर तक्रार करून मनपाचे आयुक्त राजेश मोहिते व महापौर राखी कंचलवार यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.