• अंत्री खेडेकर शिवारातील घटना
बुलढाणा : बुलडाणा आगारात कार्यरत असलेल्या एका 25 वर्षीय घटस्फोटीत महिला वाहकाचा मृतदेह तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवारात आज १६ एप्रील रोजी पहाटे आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरीत एकाच खळबळ उडाली आहे. गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशाण मृतदेहावर दिसत असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. घटनास्थळी अंढेरा पोलीस पोहोचले असून त्यांनी पंचनामा करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी या खुुन प्रकरणाचा माग काढण्यासाठी बुलडाणा येथून श्वानपथक व ठसे तज्ञानाही पाचारण करण्यात आले आहे.
तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी माधुरी भीमराव मोरे वय २५ असे या खून झालेल्या वाहक युवतीचे नाव आहे. त्या एसटी बस वाहक म्हणून बुलडाणा येथील आगारात कार्यरत होत्या. परवा त्यांचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्या बुलडाणा तालुक्यातील साखळी येथे मावशीच्या घरी मुक्कामी होत्या. दरम्यान काल ड्युटी करून आज त्यांची आठवडी सुटी असल्याने त्या अंत्री खेडेकर येथे घरी परतणार होत्या. मात्र त्याचा मृतदेह भल्या पहाटे अंत्री खेडेकरच्या शिवारात आढळला. मृतदेह संशयास्पद अवस्थेत असल्याने खून झाल्याचे दिसून येत आहे. भल्या पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या ग्रामस्थांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी गावात ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी अंढेरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार राजरत्न आठवले यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खूनाचा प्रकार असल्याने त्यांनी बुलडाण्यावरून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले पंचनामा आणि खुन्याचा माग काढला जात आहे. मृतक माधुरी यांचा पाच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यापूर्वी त्या जाफराबाद आगारात कार्यरत होत्या. तिथे असताना एक एसटी वाहक त्यांची नेहमी छेड काढत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी बुलडाणा आगारात बदली करून घेतली होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले. पोलीस या दृष्टीनेही तपास करणार आहेत. खुनापूर्वी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे.