◆ कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक मंडळे कार्यरत आहे. त्यामुळे सदर विभागाशी संबधित कामांना गती देण्यासाठी येथे पूर्णवेळ सहाय्यक कामगार आयुक्त यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुबंई मंत्रालय येथे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. हसन मुश्रीफ यांना दिले आहे.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यातर्गत अनेक मंडळे कार्यरत आहे व या मंडळाचे कामकाज कार्यभार व ऑडीट करण्याची जबाबदारी ही सहाय्यक कामगार आयुक्त यांची असते. मात्र चंद्रपूर येथे सन २०१५ पासून सुरक्षा रक्षक मंडळ अस्तित्वात आले परंतु आजपावेतो पूर्णवेळ सहाय्यक कामगार आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांच्या डिजिटल आयकार्ड, त्यांच्या सॉफ्टवेअरचा प्रश्न तसेच ई.एस.आय सुविधा, मेडिकल सुविधा तसेच सुरक्षा रक्षकाचे वेतन अशा अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पुढे उभ्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या न्यायिक मागण्यांची पूर्तता करण्याकरिता व त्यांच्या समस्या तात्काळ सुटाव्यात याकरिता चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात पूर्णवेळ सहाय्यक कामगार आयुक्त यांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे.