गडचिरोली : तीन मुलींचा वैनगंगा नदीत बुडून मृत्‍यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वाघोली गावांतील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून अंत झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास घडली. सोनी मूकरू शेंडे (वय १३), समृद्धी ढिवरु शेंडे (११) व पल्लवी रमेश भोयर (१५) अशी मृत मुलींची नावे आहेत. पल्लवी ही गडचिरोली तालुक्यातील येवली येथील असून ती आपल्या मामाकडे वाघोलीला आली होती.

शाळेला सुट्ट्या असल्याने तिन्ही मुली दुपारच्या सुमारास छोट्या नावेत बसून आंबे तोडण्याकरिता दुसऱ्या काठावर जात होत्या. खोल पाण्याजवळ जाताच नाव हेलकावे घेऊ लागली. एवढ्यात  तीनही मुली खाली पडल्या. तिघींना पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांचा करुण अंत झाला. नावाडी हा कसाबसा पोहून दुसऱ्या काठावर पोहचू शकला. मात्र या तीनही मुलींना तो वाचवू शकला नाही. विशेष म्हणजे मृत झालेली सोनी व समृद्धी या सख्या चुलत बहिणी असून पल्लवी ही या दोन मुलींची मेहुणी आहे. ही घटना गावांमध्ये पसरताच संपूर्ण गावांत शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी येथील एक पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या तीनही मुलींच्या मृतदेहांचा घटना स्थळी पंचनामा करून हे मृतदेह पोस्टमार्ट्मसाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.