शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्‍यांग बांधवांना त्‍यांच्‍या हक्‍काचा 5 टक्‍के राखीव निधी त्‍वरीत देण्‍यात यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : भारत सरकारच्‍या दिव्‍यांग व्‍यक्‍ती हक्‍क अधिनियम 2016 मधील कलम 37  ब मधील तरतुदींच्‍या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील दिव्‍यांग व्‍यक्‍तींना दारिद्रय निमुर्लन योजनेअंतर्गत 5 टक्‍के राखीव निधी तात्‍काळ देण्‍यात यावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्‍यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्‍णसंख्‍या व म़त्‍युदर लक्षात घेता पुन्‍हा एकदा कडक निर्बंध लागु करण्‍यात आले आहे. कोरोनाची एक लाट संपण्‍यापुर्वीच दुसरी लाट निर्माण झाली आहे. अनेकांचे रोजगार यामुळे हिरावले गेले आहेत. अशा परिस्थितीत दिव्‍यांग व्‍यक्‍तींना आपल्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्‍यंत कठीण झाले आहे. भारत सरकारच्‍या दिव्‍यांग व्‍यक्‍ती हक्‍क अधिनियम 2016 मधील कलम 37  ब मधील तरतुदींच्‍या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील दिव्‍यांग व्‍यक्‍तींना दारिद्रय निमुर्लन योजनेअंतर्गत दिव्‍यांग बांधवाना देय असलेला 5 टक्‍के राखीव निधी अदयाप दिव्‍यांग बांधवांच्‍या खात्‍यात जमा झाला नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. राज्‍यातील अनेक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील दिव्‍यांग बांधव त्‍यांच्‍या हक्‍काच्‍या या निधीपासुन वंचित असल्‍याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोरोना काळात प्रतिकुल आर्थीक परिस्थितीचा सामना करणा-या दिव्‍यांग बांधवांना त्‍यांचा हक्‍काचा हा राखीव निधी तातडीने मिळावा याद़ष्‍टीने शासनस्‍तरावरून सर्व महानगरपालिका व नगरपालिकांना तसेच जिल्‍हा परिषदांना निर्देश देण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.