वडिलांच्या मृतदेहाऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिला;  संतप्त नातेवाईकांची शहा हाॅस्पिटलमध्ये तोडफोड

यवतमाळ : शहरातील ॲड.अरुण गजभिये आजारामुळे येथील शहा हाॅस्पिटलमध्ये भरती होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड.गजभिये यांचा नसून दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतापलेले नातेवाईक मोक्षधामातून थेट शहा हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी डाॅक्टर व उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, गजभिये यांच्याऐवजी सेवानिवृत्त सहायक फाैजदार दिगांबर शेळके (रा.आर्णी) यांचा मृतदेह दिल्याचे दिसून आले. शेळके यांचाही शनिवारी रात्रीच मृत्यू झाला होता. मात्र बिलाची रक्कम जमा न केल्याने त्यांचा मृतदेह रुग्णालयाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगांबर शेळके यांनी केला. ते मृतदेहासाठी रात्रीपासून रुग्णालयात ताटकळत होते. त्यांना रुग्णालय प्रशासनाने अद्याप प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे, असे सांगून ताटकळत ठेवले. त्यामुळे शेळके यांचे नातेवाईकही संतापले होते. या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तोपर्यंत रुग्णालय परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आयसीयू कक्षाचे प्रवेशद्वार तोडण्यात आले.

मृतदेह आम्ही दिलाच नाही

या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी ॲड.गजभिये यांचा मृतदेह रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना दिलाच नसल्याचे डाॅ.सारिका शहा यांनी सांगितले. यामुळेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाने जर ॲड.गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिला नसेल तर तो त्यांनी कसा नेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ऑक्सिजन संपल्याने नातेवाईकांचा टाहो

शहा हाॅस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहे. रविवारी गोंधळाची स्थिती सुरू असतानाच एका जम्बो सिलिंडरमधील ऑक्सिजन संपला. खाली गोंधळ सुरू असताना वाॅर्डातून नातेवाईक धावत आले. त्यांनी ऑक्सिजन संपल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसही हतबल होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बोलवा, ऑक्सिजन सिलिंडर बदलवा, अन्यथा आमचा रुग्णही दगावू शकतो, असे आर्जव नातेवाईक करीत होते. एकंदरच हे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. या १५-२० मिनिटांचा अवधी निघून गेला, तेव्हा ऑक्सिजन घेवून एक वाहन रुग्णालयात दाखल झाले. पुढील प्रक्रिया त्यांनी केली.