Covid Guidelines : किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार!

मुंबई : राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून या अनुषंगाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

संचारबंदी असतानाही किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी ७ ते ११ अशी चार तासांचीच वेळ देण्याचा विचार सुरू आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने तसे बदल केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हा निर्णय जिल्हा पातळीवर न सोडता राज्यासाठी ज्या गाइडलाइन्स निश्चित करण्यात आल्या आहेत त्यात हा बदल केला जावा, असे आम्हाला वाटते, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले.

‘ब्रेक द चेन’ अशी मोहीम आपण हाती घेतली आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडायची असेल तर आपल्याला संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यासाठी विनाकारण जे रस्त्यावर फिरतात त्यांना अटकाव करावाच लागेल, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले. राज्यात दुर्गम भागात जे जिल्हे आहेत तिथे अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता आहे. तिथे जे पालक सचिव नेमले आहेत त्यांना अधिक सक्रिय व्हावं लागेल, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.